नवी दिल्ली – शुक्रवारी 24 तासांत देशात 16 हजार 746 नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. आतापर्यंत देशभरात 1 हजार 270 लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे, त्यापैकी 320 रुग्ण बरे झाले आहेत.
तर राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचे 85 रुग्ण आढळले आहेत. मुंबई पुण्यात ओमायक्रोन समूह संसर्ग सुरू झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आल आहे. पुण्याच्या आयसर संस्थेने घेतलेल्या 38 नमुन्यांच्या चाचण्यामधून मुंबई पुण्यात ओमायक्रोन समूह संसर्ग सुरू झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आलं आहे. या ३८ लोकांचा परदेशी प्रवासाचा इतिहास नाही. तरीसुद्धा यांना ओमायक्रोनची लागण झाली असल्यामुळे राज्य साथरोग सर्वेक्षण कक्षाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी मुंबई पुण्यात ओमायक्रोन समूह संसर्ग सुरू झाल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, देशात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 16 हजार 746 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारपेक्षा हे प्रमाण तीन हजारांनी जास्त आहे. आता देशात करोनाचे 91 हजार 361 सक्रिय रुग्ण आहेत. देशभरात गेल्या 24 तासांत 220 लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 81 हजार 80 झाली आहे. आकडेवारीनुसार 7 हजार 585 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 66 हजार 363 लोक करोनामुक्त झाले आहेत.