सातारा- खटाव तालुक्यातील एका गावातील मुलाने त्याच गावातील मुलीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या घरातील लोकांनी आक्रमक पवित्रा घेत, मुलाच्या घरातून मुलीची सुटका करून घेतली. मात्र, या प्रकरणात अचानक सातारा एसपींच्या कथित स्विय्य सहाय्यकाची (पीए) एंट्री झाल्याने वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. सातारा एसपींची पीए असल्याचे सांगून एका महिलेने संबंधित गावच्या सरपंचालाच फोन करून प्रकरण आजच्या आज मिटवा असा दम दिल्याने एसपींचा “पीए’ म्हणून बोलणाऱ्या त्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,खटाव तालुक्यातील एका गावातील मुलगी साताऱ्यातून काहीदिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल होती. त्यानंतर सदर मुलीला तिच्याच गावातील एका मुलाने पळवून नेल्याचे समोर आल्यानंतर दोन्हीकडच्या लोकांच्यात बाचाबाचीला सुरूवात झाली. परिणामी मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरात कोंडून ठेवलेल्या मुलीची सुटका करून तिला परत नेल्याची घटना घडली होती.
त्यानंतर एका नंबरवरून मुलीचे नातेवाईक असलेले व त्या गावचे विद्यमान सरपंच यांना सातारा एसपींच्या कथित “पीए’चा फोन आला होता. यावेळी पीए म्हणून बोलणाऱ्या त्या महिलेने स्वत:चे नाव सांगणे टाळून सदर प्रकरण आजच्या आज मिटवा असा दम थेट सरपंचांनाच भरला आहे. याबाबत संबंधित सरपंच आणि नातेवाईक हे सातारा एसपींची भेट घेवून सदर महिलेवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती एका नातेवाईकाने “प्रभात’शी बोलताना दिली आहे.
“ती’ महिला सातारा पोलीस दलात नाही
घटनेची माहिती मिळाल्यानंतर खात्री करण्यासाठी “प्रभात’ने सातारा एसपींचे वाचक असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांच्याशी संपर्क साधून घडल्या प्रकाराचे रेकॉर्डींग त्यांना एकवले तसेच त्या महिलेचा मोबाइल नंबर दिला असता, सदर महिला सातारा पोलीस दलात कार्यरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.