World 1st Olympic Boxing Qualifying Event in Busto Arsizio, Italy : जागतिक ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. दीपक बोरिया आणि नरेंद्र कुमार यांच्या पराभवानंतर रविवारी रात्री उशिरा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती जास्मिन लांबोरियालाही ( Jaismine Lamboria ) 60 किलो वजनी गटात पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या जास्मिनला जपानच्या आयका तागुशीकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागला. दरम्यान, अजूनही या स्पर्धेत सहा भारतीय बॉक्सर पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळविण्याच्या शर्यतीत आहेत.
या स्पर्धेतील ऑलिम्पिक कोट्यापासून वंचित राहिलेले बॉक्सर्स 23 मे ते 3 जून दरम्यान बँकॉक (थायलंड) येथे होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळतील.
आतापर्यंत भारताकडून निखत जरीन, लव्हलिना बोरगोहेन, प्रीती पवार, परवीन हुडा यांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळवला आहे.