बारामती- जागतिक दिव्यांगदिनानिमित्त येथील बाल कल्याण केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. बालकल्याण केंद्र, पंचायत समिती, बारमती नगरपालिका, प्रहार संघटना, बारामती मूकबधीर संघटना तसेच अपंग कल्याण कक्षाच्या वतीने संयुक्तपणे हा कार्यक्रम झाला. या निमित्ताने दिव्यांगाच्या रॅलीचेही आयोजन केले गेले.
यानंतर गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी दिव्यांगासाठी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची माहिती दिली. यात निर्वाह भत्ता, घरकुल, पिठाची चक्की, बीजभांडवल अशा योजनांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे डॉ. वानखेडे यांनी दिव्यांगाना नवीन प्रमाणपत्र काढण्यासाठी यूआयडी कार्ड व अस्थिव्यंगांसाठी कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्याबाबत माहिती दिली. बाल कल्याण केंद्राचे डॉ. अनिल मोकाशी यांनी दिव्यांगाप्रती समाजातील संकुचित दृष्टिकोन दूर करण्याची गरज बोलून दाखविली. या प्रसंगी नगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नगरसेविका शारदा मोकाशी, सुधीर जन्नू, पांडुरंग बोराटे उपस्थित होते. संदीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. मालती खैरे यांनी आभार मानले.