पुणे : ३ जून, आज जागतिक सायकल दिन. एप्रिल २०१८ मध्ये युनायटेड नेशन्सच्या जनरल असेम्ब्लीने ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला. आजच्या काळात सायकल चालवणे किती महत्वाचे आहे याबद्दल अनेक जण जनजागृती करताना पाहायला मिळतात. परंतु प्रत्यक्षात अगदी मोजकेचं नागरिक सायकलीचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात करताना पाहायला मिळतात.
अवगत विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होते खरी मात्र त्यामुळे आपल्या शरीरावर तसेच मनावर होणार परिणाम आणि त्यामुळे वयोमानानुसार उद्भवणाऱ्या व्याधी ज्यावेळी समोर येतात त्यावेळी मात्र वेळ निघून गेलेली असते. पूर्वी दुचाकी ऐवजी सायकलचा वापर लोक करत होते. दैनंदिन कामांसोबत त्यांचा उत्तम व्यायामही होत असे. शरीर दणकट झाल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही उत्तम होती. मोठमोठ्या शहरांमध्ये शाळेतील विद्यार्थी सोडले तर सायकल वापरणारे नागरिक क्वचितच नजरेस पडतात. कोरोनासारख्या विषाणूशी दोन हाथ करायचे म्हटल्यावर रोगप्रतिकारशक्ती दणकट असणे अत्यावश्यक आहे.
सायकलिंग हा एक उत्तम व्यायाम
सायकल चालवणे हे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. केवळ इंधनाची बचतच नाही तर निरनिराळ्या शारीरिक व्याधी आणि आजारांपासून संरक्षण करण्याचे काम सायकल करते. आजच्या धावपळीच्या युगात व्यायामासाठी वेळ काढणे सर्वांनाच शक्य नसते. परंतु सायकल चालवणे हा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील ती हातभार लावते.