पिंपरी -निवडणूक आहे म्हणून महिला संघटनेची बांधणी भारतीय जनता पार्टी करीत नाही. दोन वर्षांपूर्वी जेव्हा पक्षाची कार्यकारिणी जाहीर झाली तेव्हापासून आम्ही कामाला सुरुवात केली आहे, अशी माहिती भाजपच्या महिला शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे यांनी दिली.
दै. प्रभातच्या पिंपरी कार्यालयात गणरायाची आरती करण्यासाठी भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने आल्या होत्या. त्या वेळी बोलताना गावडे म्हणाल्या, “”महापालिकेच्या 32 प्रभागांमध्ये 32 महिला अध्यक्षांची नियुक्ती करून आम्ही पक्षाच्या कामाला सुरवात केली. एकीकडे पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचवत होतो. तर दुसरीकडे महिलांच्या तक्रारी सोडविण्यात येत होत्या. केवळ प्रभाग अध्यक्षांच्या नियुक्ती करून आम्ही थांबलेलो नाही. तर प्रत्येक बूथपर्यंतची रचना आम्ही पूर्ण केली आहे. आता कधीही निवडणुका जाहीर झाल्या तरी आम्ही ती निवडणूक लढविण्यास सज्ज आहोत.
सध्या आमच्याकडे महिला अत्याचार किंवा लहान मुलींना फसविण्याच्या तक्रारी येतात. मी त्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांना आवश्यकता भासल्यास पोलीस मदतही मिळवून देते. आमदार उमा खापरे यांच्या माध्यमातूनही महिलांना मदत करते. केवळ तक्रारीच सोडवत नसून, अनेक महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे. शहरात भाजपच्या माध्यमातून बचत गटांची चळवळही उभारली आहे. दोन वर्षांनंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. देवा गणरायचे नागरिकांवरील करोनाचे संकट दूर केले आहे. त्यांची कृपा सगळ्यांवर अशीच कायम राहो, हीच प्रार्थना करते.