वडूज – खटाव तालुक्यात ग्राहक पंचायतीचे कार्य उत्तम असून, शासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. ग्राहक पंचायतीचे काम खेड्यापाड्यांतील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांनी ग्रामसभांमध्ये ठराव मांडून, जनजागृती करावे, असे प्रतिपादन निवासी नायब तहसीलदार शिर्के यांनी केले.
जागतिक ग्राहक दिन वडूज येथे उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रा. पी. डी कुलकर्णी, विद्याधर कुलकर्णी, पुरवठा अधिकरी श्रीकांत शेंडे, संभाजी इंगळे, सुभाष घाडगे, विलास जाधव, चंद्रकांत पाटील, अंकुश दबडे, निवास कदम, शासकीय अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
शिर्के म्हणाले, प्रत्येक गावात ग्राहक संरक्षणाबाबत ग्रामसभेत ठराव मांडावा. ग्राहकांना या चळवळीची माहिती करून द्यावी. प्रा. कुलकर्णी म्हणाले, सन 1962 मधे जागतिक ग्राहक चळवळ जॉन एफ. केनडी यांनी अमेरिकेत सुरू केली. 1974 मध्ये पुणे शहरातील ग्राहकांसाठी बिंदूमाधव जोशी, पु. ल. देशपांडे, ग. वा. बेहेरे, प्रभाकर पाध्ये, मधुकर मंत्री यांनी चळवळ सुरू केली. 1975 मध्ये मुंबईत ग्राहक पंचायतीची स्थापना झाली. खटाव तालुक्यातील प्रत्येक गावात ग्राहक सेवा केंद्र सुरू करून, महाराष्ट्र ग्राहक पंचायत प्रत्येक ग्राहकाला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करेल. विद्याधर कुलकर्णी, अजय शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. सिद्धराम गोसावी यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. अंकुश दबडे यांनी आभार मानले.