वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या पुढाकाराने “खेळ खेळुया, लहानपण जगुया” या घोषवाक्यानुसार वडगाव शहरातील महिलांसाठी जुन्या काळातील पारंपरिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मा नगराध्यक्ष मयूर ढोरे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, मा नगरसेवक पूनम जाधव, मोरया महिला प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, संचालिका आणि वडगाव शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महाराष्ट्रात अनेक पारंपारिक खेळ आहेत. त्यांतून आपल्या संस्कृतीचे दर्शनही घडते. महिलांना या खेळांकडे आकर्षित करण्यासाठी रस्सी खेच, लिंगोरचा, खो-खो, दोरीच्या उड्या, धावणे, लिंबू चमचा, सारीपाट इतर पारंपरिक खेळात सुमारे एक हजाराहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी विजेत्या ताराराणी संघास आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या झालेल्या सर्व स्पर्धकांना मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
या खेळांत नावनोंदणी केलेल्या महिलांच्या राजमाता जिजाऊ, ताराराणी, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी इतर संघांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्राध्यापक राजेश खांबकर, हर्षदा दुबे, हनुमंत जांभूळकर, गणेश जाधव या प्रशिक्षकांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
या खेळांमुळे रोजच्या कामांमधून वेळ काढून लोक एकत्र येतात, खेळतात, करमणूक होते, संवाद वाढतो आणि मन प्रसन्न राहते. आपल्या संस्कृतीची आठवण म्हणून आपण येत्या पिढीला हे खेळ शिकवायला हवे. अबोली ढोरे, अध्यक्षा, मोरया महिला प्रतिष्ठान