महाळुंगे (पुणे) – कॅन्टींग मॅनेजरने कामगार महिलेचा विनयभंग केल्याची घटना सावरदरी (ता. खेड, जि.पुणे) येथे घडली. याप्रकरणी 44 वर्षीय महिलेने महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रामसिंह श्रीउमानाथ सिंह (रा. सावदरी, ता. खेड, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला द्वारीका कॅन्टींग येथे भांडी घासण्याचे काम करतात. सदर महिला बुधवारी (दि. 27) भांडी घासण्याचे काम पूर्ण करून जात असताना कॅन्टींग मॅनेजर रामसिंह याने महिलेच्या खांद्याला हात लावून रात्री माझ्या रुममध्ये ये असे म्हणाला. त्यामुळे महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर त्यांनी महाळुंगे पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मॅनेजर रामसिंह याच्यावर महाळुंगे पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.