नगर -नगर-पुणे महामार्गावर केडगाव येथील हॉटेल अंबिका समोर स्कूटरला झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर दुसरी गंभीर जखमी झाली. हा अपघात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.
मनीषा बाळासाहेब कापरे (वय-38) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच रेखा प्रशांत चव्हाण (वय-33) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोघी सख्या बहिणी आहेत. कापरे व चव्हाण या दोघी आज सकाळी स्कूटरवरून केडगावहून सोनेवाडी-अकोळनेर बायपासने जात असताना समोरुन आलेल्या ट्रकने (क्र. टीएन- 52 एफ- 6085) त्यांना जोराची धडक दिली. त्यात मनीषा कापरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेखा चव्हाण या गंभीर जखमी झाल्या आहेत.
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात बाबासाहेब गारुडकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञाच चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची माहिती समजताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लोखंडे, सहायक पोलीस निरीक्षक भंगाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, यावेळी ट्रकचालक पसार झाला होता. अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. राष्ट्रवादीचे नेते अंबादास गारुडकर यांच्या या दोघी पुतणी आहेत.