भोपाळ- खुनाचा आरोप असलेल्या तुरुंगातील एका 20 वर्षीय महिला कैद्यावर पाच पोलीस कर्मचाऱ्यांनीसामूहिक बलात्कार केल्याचा आरोप कैदी महिलेनं केला आहे. मध्य प्रदेशातल्या रेवा जिल्ह्यातल्या मंगावन शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मे महिन्यात पोलिसांनी 10 दिवस सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे.
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, विधी अधिकारी आणि दोन वकिलांनी 10 ऑक्टोबरला मंगावन तुरुंगाची पाहणी केली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तुरुंगात असलेल्या पीडित महिलेनं तिची व्यथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांना सांगितली. तुरुंगात घडलेल्या प्रकाराबद्दल वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांनी खून प्रकरणात गोवण्यात येईल, अशी धमकी पोलिसांनी दिली होती. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी तिचा जबाब नोंदवला. तो जिल्हा न्यायाधीशांकडे पाठवण्यात आला. यानंतर या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले.
विशेष म्हणजे, रेवाचे पोलीस अधीक्षक राकेश सिंह यांनी या प्रकरणावर भाष्य करताना वेगळाच दावा केला. सदर महिलेने 9 ते 21 मे दरम्यान अत्याचार झाल्याची तक्रार केली आहे. मात्र आम्ही तिला आणि तिच्या मैत्रिणीला 21 मे रोजी अटक केली. खुनाच्या आरोपाखाली मंगवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघींना ताब्यात घेण्यात आलं होतं, असं सिंह यांनी सांगितलं.
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी 10 ऑक्टोबरला तुरुंगाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या विधी पथकातले वकील सतीश मिश्रांनी पीडित महिलेकडे इतके महिने गप्प का राहिलीस, याबद्दल विचारणा केली. त्यावर तीन महिन्यांपूर्वी आपली आपबिती वॉर्डनच्या कानावर घातली होती. अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी तुरुंगातच असल्यानं याबद्दल भीती वाटत होती, असं पीडितेनं सांगितलं.