मुंबई – या आठवड्यात होणार असलेली अमेरिकेची निवडणूक आणि करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जागतिक शेअरबाजारातून नकारात्मक संदेश आले. त्यामुळे भारतीय शेअरबाजारातही विक्री होऊन निर्देशांकांत घट झाली.
गुरुवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 172 अंकांनी म्हणजे 0.43 टक्क्यांनी कमी होऊन 39,749 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 58 अंकांनी कमी होऊन 11,670 अंकांवर बंद झाला. एचडीएफसी बॅंक, एचयुएल, टायटन, ऍक्सिस बॅंक, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली. एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बॅंक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स या संस्थेचे संशोधक नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले की, युरोपात अनेक देशांत लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. याचा जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये या आठवड्यात निवडणुका होत आहेत.
दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकन सरकार पॅकेज जाहीर करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर होत आहे. आज धातू, वाहन, रिऍल्टी, क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याचे दिसून आले.