मुंबई : मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते ती त्यांनी मनातून काढून टाकावी, मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही.
याबाबत ओबीसी समाजाच्या शंका आणि भीती दूर करण्यासाठी ऍडव्होकेट जनरल यांच्यासमवेत तुमची भेट घडवून आणू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
ओबीसी व भटके विमुक्तांच्या न्याय मागण्यांसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रकाश शेंडगे, हरिभाऊ राठोड यांच्यासह ओबीसी चळवळीतले अनेक नेते व्हिडिओ कॉन्फरन्सींगमध्ये सहभागी झाले.
ओबीसींचे कोणतेच प्रश्न दुर्लक्षित राहणार नाहीत. बारा बलुतेदार समाजाच्या प्रश्नांकडेही लक्ष आहे. नाभिक, मच्छिमार समाजाचे प्रश्न माहित आहेत. कोरोनाचे संकट हे जगावर आलेले संकट आहे. कोणत्या एका समाजावरचे ते संकट नाही. आज सर्वच समाज संकटात आहेत, या संकटाची व्याप्तीही मोठी आहे त्यामुळे जपून पावले टाकावी लागत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.