पुणे – राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. तसेच ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संभाजीराजे यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
संभाजीराजे म्हणाले, लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी हा दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी ही संघटना स्थापन करणार आहे.
संभाजीराजेंचा राज्यसभेचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी पुढची आपली भूमिका आज (12 मे) रोजी जाहीर केली. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अनेक राजकीय पक्षांची धडपड सुरु होती. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमध्ये यावे त्यांचे स्वागत करु, असे जाहीरपणे सांगितले आहे. तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाजीराजे यांचे स्वागत करु असे म्हटले होते. मात्र, आता संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे. त्यानुसार ते आता अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.