पुणे – प्रभागात समान पाणी योजनेचे काम करण्यापूर्वी आम्हाला भेटला का नाही..? अशी विचारणा करीत महापालिकेच्या ठेकेदाराला भाजपच्या महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. दरम्यान, मारहाणीनंतर दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण वाढू नये याची दक्षता घेण्यात आली असून या प्रकरणी पालिका प्रशासनावरही दबाव टाकला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, महापालिकेत गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपवर विरोधकांकडून भ्रष्टाचाराचा अरोप करण्यात येत असताना अशा प्रकारची मारहाणीची घटना म्हणजे ठोस पुरावाच समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा समान पाणी योजना हा महत्वांकांक्षी प्रकल्प असून त्यास आधीच उशीर झाल्याने महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला फटका बसेल म्हणून तो वेगाने पूर्ण करण्यासाठी भाजपकडून पाठपुरावा सुरू आहे. परिणामी, प्रशासनाकडून शहरभर खोदाईसाठी बंदी असतानाही समान पाणी योजनेसाठी पावसाळ्यातही जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाई कामाला सहमती दिली आहे. त्यानुसार, जलवाहिनीचे काम मिळालेल्या कंपनीने एका सब कॉन्ट्रॅक्टरकडे हे काम दिले आहे.
महापालिकेस सूचना देऊन मार्केटयार्डच्या आसपासच्या भागात हा ठेकेदार खोदाई सुरू करण्यास गेला होता. त्यावेळी महापालिकेतील एका माजी पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदारास काम करण्यास मनाई केली. तसेच, आमच्या साहेबांना का भेटला नाही.., कामाची कल्पना का दिली नाही, अशी विचारणा केली. मात्र, आता महापालिकेत नगरसेवक अस्तित्वात नसल्याने तसेच पदाधिकारीपदही नसल्याने या ठेकेदाराने “मी तुमच्या साहेबांना ओळखत नाही..’ असे सांगत काम सुरूच ठेवले.
त्यामुळे संतापलेल्या या पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांसह ठेकेदाराला मारहाण केली. हे प्रकरण आंगलट येण्याची शक्यता लक्षात घेऊ ते मिटविण्यात आले. “या पूर्वी ठेकेदार साहेबांना भेटले तेव्हा याच साहेबांनी या ठेकेदाराचे कौतुक केले होते. मात्र, अचानक काय झाले? अशी चर्चा प्रशासकीय वर्तूळात सुरू आहे.