निमोणे -पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदासाठी जिल्ह्यात रविवारी (दि. 2) अनेक ठिकाणी मतदान घेण्यात आले.शिरूर तालुक्यातून अ वर्गासाठी विद्यमान आमदार अशोक पवार आणि आबासाहेब गव्हाणे यांच्यात लढत होत आहे.
गेली अनेक वर्षे बॅंकेचे संचालकपद भूषविलेले निवृत्तीअण्णा गवारे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने अशोक पवार यांना ही निवडणूक सोपी जाईल अशी चर्चा सध्या शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. परंतु कोण मारणार जिल्हा बॅंकेचा आखाडा हे निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यती करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधि काऱ्यांनी रद्द केल्याने त्याचाही थेट परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा 2014 साली विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी त्यापुढील प्रत्येक निवडणुकीत तालुक्यातील सगळी सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवून तालुक्यातील राजकारणात आपला दबदबा कायम ठेवला.
त्यानंतर 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिरूर-हवेलीतील सगळ्या विरोधकांनी भाजप उमेदवारांच्या बाजूने आपली ताकद लावली होती. असे असतानाही विरोधी उमेदवाराचा दणदणीत पराभव करत आमदार अशोक पवार यांनी सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतही आपली सगळी ताकद पणाला लावली आहे.
अशोक पवार यांची प्रचार यंत्रणा अचूक असते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत त्यांचा विजय जवळपास निश्चितच असतो. त्यामुळे आबासाहेब गव्हाणे हे अशोक पवारांना शह देणार की नाही हे येणारा काळच ठरवेल. शिरूर-हवेलीत असणाऱ्या अनेक विकास सोसायट्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्याचाही फायदा अशोक पवार यांना होऊ शकतो.