मुंबई – ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय असलेली लावणी कलाकार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे. ‘गौतमी पाटील तिच्या डान्समधून अश्लीलता पसरवतेय आहे’ त्यामुळे तिचे कार्यक्रम बंद करा असं अनेक ठिकाणी बोललं जात आहे. तर दुसरीकडे लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी गौतमीच्या ह्याच लावणी कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करतात.
मात्र, सध्या सुरु असलेल्या या सर्वच प्रकाराबाबत स्वतः गौतमी पाटीलने आपलं मत व्यक्त केलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ती बोलत होती. यावेळी गौतमीने अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्याचं दिसून आलं. “माझा लावणीचा कार्यक्रम नसून डीजे शो आहे. लोक माझ्या कार्यक्रमाला लावणीचा कार्यक्रम म्हणतात. पण त्याला लावणीचा कार्यक्रम म्हणता येणार नाही. मी लावणी करत नाही. मी डीजे शो करते’. असं तिने सांगितलं आहे.
पुढे ती म्हणाली, ‘मी एक वेस्टर्न डान्सर आहे. लहानपणापासूनच मी वेस्टर्न डान्सचं प्रशिक्षण घेतलं आहे. कार्यक्रमात डीजेवर लावणीची गाणी लागल्यानंतर मी डान्स केला. त्यामुळे लोकांना असं वाटतं की मी लावणी डान्सर आहे’. असं देखील गौतमी यावेळी म्हणाली आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक तरुण गौतमीची एक झलक पाहण्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असून, तिच्या डान्सचे अनेक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसतात.