सातारा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले आहेत. या मंत्रिमंडळाच्या विस्तार प्रक्रियेत जिल्ह्यातून भाजपच्यावतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यापैकी कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. तर शिवसेनेकडून आमदार महेश शिंदे यांचेही नाव पुढे आले असून जिल्ह्यात लाल दिवा कोणाला मिळणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला कालच एक वर्ष पूर्ण झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. या विस्तारामध्ये साताऱ्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणमधून आमदार जयकुमार गोरे आणि शिंदे गटाकडून कोरेगावचे आमदार महेश शिंदे या तिघांपैकी कोणाकोणाला संधी मिळणार या विषयाची चर्चा जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला समर्थ साथ दिल्याने पाटणचे आमदार राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे. जिल्ह्यात शिंदे गटाची पाळेमुळे मजबूत करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव चर्चेत असून शिवेंद्रसिंहराजे यांनी चार टर्म सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचा गाढा अभ्यास असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्षपदही त्यांनी यशस्वीरित्या भूषविले आहे. मात्र, आजतागायत त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवेंद्रसिंहराजे यांना मंत्रिपद देण्याचे घोषणा केली होती.
त्यामुळे यंदाच्या विस्तारात त्यांना संधी दिली जाऊ शकते. महसूल किंवा सहकार खाते त्यांना मिळू शकते, अशीही चर्चा आहे. आमदार जयकुमार गोरे यांनी तब्बल 15 वर्ष आपल्या आक्रमक नेतृत्व शैलीमुळे मतदारसंघाच्या राजकारणात राष्ट्रवादीला कायमच बॅकफूटवर ठेवले आहे. माण खटावच्या दुष्काळी तालुक्यात पाणी नेणारा लढवय्या नेता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. या पाणीदार नेत्याला राजकीय ताकद देण्याचे सुतवाच देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे जयकुमार गोरे यांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनाही शिंदे गटाकडून संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.
सत्तांतराच्या वेळी महेश शिंदे यांची भूमिका महत्त्वाची होती. कोरेगाव मतदारसंघात शिंदे गटाची पाळेमुळे त्यांनी मजबूत केली असून अनेक सत्तास्थाने त्यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातून खेचली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून महेश शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या साऱ्या चर्चेमुळे मंत्रिमंडळ विस्तारात लाल दिव्याचा मान नक्की कोणाला मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.