पुणे – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगातील बहुतांश देशांमध्ये अजूनही लसीकरण मोहीम सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सिनच्या पुरवठ्यावर बंदी घातली आहे. दरम्यान ही लस प्रभावी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले असल्याचा दावा कोवॅक्सिनचे उत्पादक असणाऱ्या भारत बायोटेकने केला आहे.
डब्ल्यूएचओने म्हटलय की, त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सींमार्फत भारत बायोटेकद्वारे निर्मित कोविड-19 लस कोवॅक्सिनचा पुरवठा निलंबित केला आहे. जेणेकरून उत्पादक कंपनी सुविधांमध्ये सुधारणा करू शकेल आणि तपासणीमध्ये आढळून आलेले काही दोष दूर करू शकेल.
जागतिक आरोग्य संघटनेने लस मिळविणाऱ्या देशांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, परंतु काय कारवाई केली जाईल हे सांगण्यात आलेले नाही. ही लस प्रभावी आहे आणि तिच्या सुरक्षिततेबद्दल कोणतीही चिंता नाही, परंतु निलंबनामुळे कोवॅक्सीनचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, हैदराबाद येथील कंपनी भारत बायोटेकने एका निवेदनात म्हटले आहे की, कोवॅक्सिन लसीच्या प्रभाव आणि सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झालेला नाही. कोवॅक्सीन घेतलेल्या लोकांना दिलेली लस प्रमाणपत्रे अजूनही वैध आहेत. दरम्यान, कंपनीकडून संबंधित प्रकियांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल.