भोर पोलीसांत गुन्हा दाखल
भोर- भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील हातनोशी येथे मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले असून पोलीसांकडून गुन्हा नोंद तसेच तपासाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पोलीसांनी सांगितले की, सोमवारी (दि.21) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हातनोशी गावचे सरपंच प्रमोद अशोकराव थोपटे हे ग्रामस्थांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभे होते. त्यावेळी तेथे मारूती कार (क्र. एमएच 12 क्यूवाय 2825) मधून सुनील कोंडीराम जावध व आनंदा दगडू मस्के (दोघे रा. पळसोशी) आले, त्यांच्याबाबत संशय आल्याने सरपंच थोपटे आणि ग्रामस्थांनी त्या दोघांची चौकशी केली असता त्यांच्याकडे 70 हजार रूपये रोख आणि दहा गावांची यादी लिहलेली आढळून आली. यामुळे त्यांना कारसह पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. ते दोघे शिवसेनेचे असल्याचे सांगत असून सरपंच थोपटे यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.