पुणे-दौंड रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे काम अद्यापही रडतखडत
दौंड- पुणे-दौंड रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू असताना पुणे शहरापर्यंत धावणारी लोकल लोणावळ्यापर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत असताना या संदर्भातील कामे रेंगाळल्याने ही लोकल कधी धावणार, असा सवाल आता प्रवाशांकडून केला जात आहे.
सोलापूर रेल्वे विभागांतर्गत समावेश असलेल्या दौंड रेल्वे जंक्शन पासून पुणे शहरापर्यंत विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यानंतर विद्युतीकरणा संदर्भातील बहुतांशी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. काही शेतकऱ्यांनी घेतलेली विरोधी भूमिका वगळता काम वेगाने सुरू आहे. यामुळे दौंड येथून पुणे शहरा प्रमाणेच लोणावळ्यापर्यंत लोकल सेवा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांतून होत होती. यासंदर्भातील प्रस्तावही विचाराधीन असल्याचे सांगितले गेले होते.
दौंड शहरातील रेल्वे कुरकुंभ मोरीजवळील केंद्रीय रेल्वेमंत्रालयाकडून मार्गाला हिरवा सिग्नल मिळाल्याने दौंड ते लोणावळा लोकलही या मार्गे धावू शकते, असे सांगितले जात होते. पुणे ते लोणावळा लोहमार्गावर विद्युतीकरण यापूर्वीच करण्यात आले असल्याने दौंडपासून लोकल लोणावळ्यापर्यंत धावू शकते. परंतु, यासंदर्भातील कामे मात्र रेंगाळली असल्याने ही लोकल अद्यापही कागदावरच असल्याने प्रवशांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
- प्लॉटफॉर्मची कामे प्रलंबित…
दौंड येथील जुना लोकोशेड बंद असून, या ठिकाणी रेल्वेच्या अवजड वाहनांची दुरुस्ती तसेच रेल्वे इंजिन दुरुस्तीचे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. विद्युतीकरणाबरोबरच पाटस, यवत, खुटबाव, कडेठाण, पाटस येथे रेल्वे प्लॉटफॉर्मची रुंदी, लांबी व उंची वाढविण्याबाबतच्या प्रस्तावानुसार यातील बहुतांशी कामे संथगतीने सुरू आहेत.