नागपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूरमध्ये शुभेच्छा देण्यात आलेल्या एका बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. कोराडी येथे लावण्यात आलेल्या या बॅनरवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा फोटो सर्वात वरच्या बाजुला लावला आहे. तर चंद्रशेखर बावनकुळेंच्या फोटोच्या खाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तीन फोटो लावण्यात आले आहेत. यावरून वाद निर्माण झाला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बावनकुळेंवर संताप व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या या बॅनरवर हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमीत्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मात्र या पोस्टरवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या वरती लावण्यात आला आहे. याकडे आव्हाडांनी सर्वांचे लक्ष वेधून संताप व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये काय म्हणाले ?
हा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना “हा काय घाणेरडा प्रकार आहे? बावनकुळेसाहेब, तुम्ही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहात, तुम्हाला हे पोस्टर मान्य आहे का?” असा सवाल विचारला.
हा काय घाणेरडा प्रकार आहे
बावन्नकुळे साहेब तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष आहात .. हे पोस्टर तुम्हाला मान्य आहे का pic.twitter.com/0iUnEyH0j6— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2023
मात्र, हा वाद वाढल्यानंतर हा बॅनर काढण्यात आला. तसेच बॅनरबाजी करणाऱ्या पाच जणांनी जाहीर माफीनामा लिहून चूक मान्य केली आहे. ही चूक आमच्याकडून झालेली आहे याकरीता सर्व सदस्यांसह माफी मागतो असा माफीनामा जाहीर केला आहे. याशिवाय संबंधित बॅनरशी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण बॅनर लावणाऱ्यांनी दिलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.