पुणे – आतापर्यंत अनेक लोकांनी काळ्या रंगाचा कावळा पाहायला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी पुण्यातील लुल्लानगर परिसरामध्ये चक्क पांढऱ्या रंगाचा कावळा पाहायला मिळाला होता. या अनोख्या कावळ्याचा फोटो सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाला होता. अनेकांनी हा पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र आता हा पांढरा कावळा इतर कावळ्यांपेक्षा वेगळा असण्यामागचे कारण समोर आले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काही काळ्या कावळ्यांसोबत एक पांढऱ्या रंगाचा कावळा रस्त्यावर असल्याचे दिसते. हा व्हिडिओ पाहून काही नेटकऱ्यांनी ‘हा कावळा ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आला आहे,’ ‘पांढरा कावळा हे कसं शक्य आहे’, अशा कमेंट्स केल्या होत्या. मात्र एखादा पांढरा कावळा असण्याची शक्यता दाट शक्यता असते. यापूर्वी देखील अशीच एक घटना समोर आली होती. शिरूर भागामध्ये अशा प्रकारचा कावळा लोकांना दिसला होता.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाचा हा दहा हजार कावळ्यांमधून एखादा सापडतो. जनुकीय विकारामुळे कावळ्यांमध्ये अल्बिनिझम किंवा ल्यूसिझम म्हणजे पंखांमध्ये रंगद्रव्य साठवण्याची क्षमता कमी होते. रंगद्रव्य साठवण्याची क्षमता कमी झाल्याने पांढऱ्या रंगाचे कावळे आढळून येतात. परंतु खूप कमी प्रमाणात असे कावळे पाहायला मिळतात.