पिंपरी -शहरातील गिर्यारोहकांनी माहुली (जि. ठाणे) येथील वजीर सुळक्यावर नुकतीच यशस्वी चढाई केली.
दक्षिणेकडील टोकाला म्हणजे वासिंद रेल्वे स्थानकाच्या दिशेला मुख्य डोंगररांगेतून सुटलेला, सह्याद्रीच्या डोंगररांगेपासून वेगळा वजीर सुळक्याचा माथा गाठणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते.
निसरडी गवताळ पाऊलवाट, 90 अंशातील सरळ उभी चढाई, पूर्वेकडे 600 फूट खोल दरीचा उतार आणि पाण्याची प्रचंड कमतरता अशी येथील परिस्थिती आहे. सुळक्याची चढाई अतिशय कठीण श्रेणीतील असून सर्व बाजूने सरळसोट कातळाने रुद्रावतार धारण केलेला आहे.
खरे तर या सर्व गोष्टी एका हाडाच्या गिर्यारोहकाला नक्कीच निमंत्रण देतात. हे आमंत्रण पॉईंट ब्रेक एडवेंचर्सच्या टीमने स्वीकारले. गिर्यारोहक जॉकी साळुंखे आणि चेतन शिंदे यांच्या सोबत सुशांत शिवाजी काटे, संतोष भोसले, हृषिकेश बोधनकर, रोहित पानसरे अशा पिंपरी-चिंचवड शहरातील गिर्यारोहकांनी हा वजीर सुळका सर केला. टीममधील सुशांत काटे यांनी यापूर्वी वानरलिंगी सुळका, कळकराई सुळका, तैल बैला, लिंगाणा आणि सहयाद्रीतील 70 पेक्षा अधिक किल्ल्यांची भटकंती
केली आहे.
गिर्यारोहण हे एक ते दोन दिवसांचे काम नाही. त्यासाठी नियमित सराव, शिस्तबद्धपणा, व्यायाम आणि अनुभवाचा साठा लागतो. या माध्यमातूनच आत्तापर्यंत विविध सुळक्यांवर यशस्वी चढाई केली आहे.
– सुशांत शिवाजी काटे, गिर्यारोहक