30 लाखांच्या अनुदानावर सोडले पाणी

वृत्तमालिका भाग 2
सुनील राऊत

रुग्ण कल्याणच्या समित्या स्थापन करून दमडीचाही खर्च नाही ः केंद्राचे अनुदान बुडाले
 
पुणे – केंद्र शासनाच्या आदेशानुसार शहरातील महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये आरोग्य विभागाकडून सुमारे 17 रुग्ण कल्याण समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र, या समित्यांच्या आणि प्रशासनाच्या बैठका झाल्या, ना या समित्यांनी एक रुपयाचाही खर्च रुग्ण तसेच रुग्णालयासाठी केला नसल्याचे समोर आले आहे. या समितीला सुमारे 1 लाख 75 हजार रुपयांचा वार्षिक खर्च करण्याची मुभा आहे. तर समितीने हा खर्च केल्यानंतर केंद्राकडून अनुदान स्वरूपात महापालिकेस हा निधी दिला जाणार होता. मात्र, पालिकेने खर्चच न केल्याने केंद्राच्या 30 लाख रुपयांच्या अनुदानावर पालिकेस पाणी सोडावे लागले आहे.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियांतर्गत नागरी किंवा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्ण कल्याण समितीचे स्थापनेचे आदेश आरोग्य संचालकांकडून देण्यात आले होते. नागरी किंवा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात समिती स्थापल्याने रुग्णांच्या सुविधेसाठी पाऊणे दोन लाखांचा निधी शासनाकडून मिळतो. निधीद्वारे रुग्ण कल्याण समितीला औषधांपासून ते विविध कामांसाठीचा वार्षिक पावणेदोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो. तसेच रुग्णांच्या गरजा पाहून त्यानुसार निधी खर्च केला जात आहे.

“रुग्ण कल्याण समिती’ला पेशंटसाठी औषध खरेदी, बाहेरून करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा तपासणी खर्च, अत्यावश्‍यक पेशंटसाठी संदर्भ सेवा, माता व बाळासाठी कपडे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था या गोष्टी समितीने पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी निधीही असताना महापालिकेने केवळ समित्यांची स्थापना केली. मात्र, त्यांच्या नियमित बैठका होतात की नाही. त्यांच्याकडून कोणता खर्च केला जातो किंवा नाही याची साधी तपासणी करण्याची तसदीही घेण्यात आली नाही. त्यामुळे या समित्या वर्षभर केवळ कागदावरच अस्तित्त्वात राहिल्याने पालिकेस केंद्राकडून या समित्यांच्या खर्चापोटी मिळणाऱ्या अनुदानावर पाणी सोडावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.