चिखली,(वार्ताहर) – स्पाइन रोडवरील पवार वस्ती भागात आज सकाळी पिण्याच्या पाण्याची वाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने येथील जलवाहिनी त्वरित दुरुस्त करून पाण्याचा होणारा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पवार वस्ती येथे स्पाइन रोडला लागून एक सोसायटी आहे. येथील ब्रिजच्या जवळ सर्व्हिस रोडला जलवाहिनी फुटल्याने वाहनांना ये-जा करताना पाण्यातून मार्ग काढावा लागत होता. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील ज्या भागात लिकेज आहे. पाइपलाइन फुटली आहे येथील गळती थांबविण्यासाठी कार्यवाही करणे गरजेचे आहे. कारण आज शहरातील नागरिकांना पाणीपट्टी भरूनदेखील पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याचा अपव्यय थांबविणे गरजेचे आहे.