पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे चक्क पाणी मीटर चोरीला जाण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे नागरिकांना विनाकारण आर्थिक झळ बसत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेषत: उपनगर परिसरात हे प्रकार वाढत आहेत.
महापालिकेच्या वतीने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मीटरनुसार वापरलेल्या पाण्याचे बिल आकारले जाते. हे मीटर घराचे बाहेरच लावलेले असतात, मात्र भुरट्या चोऱ्यांनी या मीटरवर डल्ला मारायला सुरुवात केली आहे. पाणी मीटर चोरीच्या प्रकाराने येथील नागरिक चक्रावून गेले आहेत. विशेषत: बैठी घरे, चाळी, कॉलनी भागात मीटर चोरीचे प्रकार घडत आहेत.
चोरीचा व्हिडीओ व्हायरल
काळेवाडी परिसरात रात्री चारच्या सुमारास एका कॉलनीत एक चोरटा पाण्याचे मीटर चोरत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. हा व्हिडीओ २८ मार्च २०२४ रोजीचा असून सामाजिक कार्यकर्ते विलास पाडाळे यांनी तो शेअर केला आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सांगवीत १५ पाणी मीटर चोरीला
दोन महिन्यांपूर्वी सांगवी परिसरात सुमारे १५ पाणी मीटर चोरीला गेले होते. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. परंतु, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना नवीन मीटर खरेदी करायला लावले. त्यांची रितसर नोंदणी करुन पुन्हा पाणी बिल सुरळीत सरु केले.
शहरातील अनेक भागात पाण्याचे मीटर हे घराच्या बाहेरच असतात, त्यामुळे ते चोरीला जातात. तसे पाहिले तर मीटर चोरुन तो भंगारात विकल्यास त्याची किंमत जास्त नाही. मात्र, काही लोक व्यसनासाठी ते चोरतात. नागरिकांनी आपल्या मीटर सुरक्षित राहिल याची काळजी घेतली पाहिजे.
निगडी प्राधिकरण सारख्या भागात अशी समस्या नाही, कारण तेथील नागरिकांनी त्याचे मीटर घराच्या आत घेतले आहे. मीटर चोरीला गेल्यास संबंधित नागरिकांनीच नवीन मीटर खरेदी करुन त्याची नोंदणी पाणीपुरवठा विभागाकडे करुन महापालिकेच्या अधिकृत प्लंबरकडून तो बसविला पाहिजे. – श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका