31 जुलैपर्यंत घाट बंद
‘मान्सून पीक अवर्स’मध्ये पोलीस बंदोबस्त
– संजोक काळदंते
ओतूर – पावसाळी पर्यटनासाठी माळशेज घाटात येणाऱ्या पर्यटकांना 31 जुलैपर्यंत घाटात पर्यटनबंदी करण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे लेखी आदेश लागू केले आहेत. माळशेज घाटात दरडी पडण्याचे प्रकार, तसेच यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईसह पुणे, नगर, नाशिक भागातून येणारे पर्यटक माळशेज घाटात पावसाळ्यात गर्दी करतात. या घाटातील चार धबधबे तसेच पर्यटन विभागाने विकसित केलेले दोन पॉइंट या ठिकाणांवर पोलिसांचे खास लक्ष असणार आहे. जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काही तलाव, तसेच लेण्यांजवळ देखील जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, त्यामध्ये माळशेज घाट, गणेश लेणी,पडाळे डॅम, सिद्धगड या ठिकाणांचा समावेश आहे. पावसाळी पर्यटनासाठीच्या प्रतिबंधित या ठिकाणांवर विशेष लक्ष पोलिसांकडून ठेवण्यात येत आहे. विकेंडच्या काळात तसेच लागून येणार्या सट्यांच्या काळात मोठा पोलीस बंदोबस्त येथे तैनात करण्यात येत आहे.
दरडी कोसळण्याच्या प्रमाणातही वाढ
पहिल्या पावसातच वेळ खिंड येथे 1 जुलैला दुपारी तीनच्या सुमारास दरड कोसळली होती, त्यामुळे खिंडीतून एकेरी वाहतूक काही वेळ सुरू ठेवावी लागली होती. त्यानंतर दरड हटविण्यात आली. दोन दिवस उलटत नाही तोच बोगद्याजवळ देखील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू ठेवावी लागली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग पथकाने ही दरड हटवून वाहतूक सुरळीत केली.
तत्काळ कार्यवाहीसाठी उपाययोजना
माळशेज घाटात सुरक्षेचे पुरेशी उपाययोजना करण्यासाठी कामे सुरू आहेत; परंतु अचानक दरड पडून रस्ता बंद होणे,आपत्कालिन परिस्थिती निर्माण होणे या संभाव्य शक्यता लक्षात घेऊन माळशेज घाटात कायमस्वरूपी एक जेसीबी मशिन तैनात ठेवण्यात आले आहे, तसेच काही घटना घडल्यास आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी 10 मजूर कायमस्वरूपी घाटात कार्यरत असणार आहेत.
शनिवार रविवार, तसेच लागून येणाऱ्या सुट्ट्यांच्या काळात माळशेज घाटात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह 35 पोलीस कर्मचारी घाटात बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. माळशेज घाटातील चार धबधबे तसेच एमटीडीसीने विकसित केलेल्या पाइंटवर विखरून बंदोबस्त ठेवण्यात येईल.
काही कर्मचारी सिव्हीलमध्ये आहेत, तर इतर दिवशी घाटमार्गावर पोलीस पेट्रोलिंग करण्यात येत असून, गैवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारावाई करण्यात येणार आहे.
-सुहास खरमाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, टोकावडे पोलीस ठाणे