पुणे -शहरात करोनाचा शिरकाव होताच पुणे जिल्हा परिषदेकडून तत्काळ जिल्ह्याच्या सीमांवर नाकाबंदी करत या विषाणूला ग्रामीण भागात प्रवेश करण्यास अटकाव केला. त्याला काहीप्रमाणात यशही आले. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाले आणि मुंबई, पुणे शहरासह अन्य जिल्ह्यांतून पुणे ग्रामीण भागात नागरिक आले. त्यामुळे मागील महिन्याभरात ग्रामीण भागातील करोना बाधितांची संख्या तब्बल आठशेपर्यंत पोहोचली. सध्या ग्रामीण भागातील प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण, स्वॅब तपासणी युद्ध पातळीवर सुरू आहे.
पुणे ग्रामीण भागात 26 जूनपर्यंत एकूण 911 रुग्ण होते. त्यापैकी 537 बरे झाले, तर 340 एकूण क्रियाशील रुग्ण आहेत. 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे ग्रामीण भागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62.63 टक्के, तर मृत्यूचे प्रमाण 4.06 टक्के आहे. दरम्यान, जिल्ह्यांच्या सीमांवर 20 ठिकाणी आरोग्य तपासणी नाके उभारले असून तपासणी करून प्रत्येक व्यक्तीची रजिस्टरमध्ये नोंद घेण्यात आली. आतापर्यंत 20 लाख लोकांची तपासणी करण्यात आली. करोना विशेष नियंत्रण कक्षाद्वारे 37 हजारांहून अधिक कॉल्स हे समन्वयासाठी झाले आहेत.
जिल्ह्यातील 9 लाख 34 हजार 538 कुटुंबांचे “आशा सर्वेक्षण’ केले असून त्यामध्ये फीवर क्लिनीक एकूण बाह्यरुग्ण संख्या 2 लाख 89 हजार 690, तर सर्दी, ताप, खोकला इतर रुग्ण 11 हजार 206 होते. संदर्भित केलेल्या रुग्णांची संख्या 696 इतकी होती. अतिजोखमीच्या व्यक्तींना शिक्के मारून घरी विलगीकरण केले. विलगीकरण झालेल्या व्यक्तींवर आशा व ग्रामपंचायतीमार्फत विशेष लक्ष ठेवले. ग्रामीणमध्ये एकूण 306 प्रतिबंधात्मक क्षेत्रांपैकी 173 क्षेत्रात यशस्वी कार्यवाही पूर्ण झाली. उरलेल्या 133 क्रियाशील क्षेत्रामध्ये 3055 पथके कार्यरत आहेत.
दररोज 50 ते 100 घरांचे सर्वेक्षण
एका पथकाकडून दररोज 50 ते 100 घरांचे सर्वेक्षण केले जात असून आतापर्यंत 11 लाख 43 हजार 215 नागरिकांचे पूर्ण झाले आहे. 141 ग्रामपंचायत आणि 11 नगरपालिकांमध्ये झालेल्या सर्वेक्षणात 2699 अतिजोखीम आणि 4914 कमी जोखीम संपर्क असलेले होते. लक्षणे असलेल्या रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी होते. शेवटचा रुग्ण आढळल्यापासून 14 दिवसांपर्यंत सर्वेक्षण चालते. बाधित रुग्णाच्या संपर्कातील 345 केसेस सर्वेक्षणाच्या मदतीने शोधून काढल्या आहेत. सहव्याधी सर्वेक्षणामध्ये (कोमॉर्बिड सर्वेक्षण) ग्रामीण भागात 60 वर्षांवरील 6 लाख 28 हजार 36, तर इतर व्याधी असलेल्या व्यक्ती 2 लाख 9 हजार 30 आढळून आले.