तीन दिवसांत पुणेकरांनी मोजला 58 हजार रुपयांचा दंड
पुणे – शहरात करोनाचा उद्रेक झाला असला, तरी पुणेकरांना मात्र त्याची काहीही चिंता नसल्याचे दिसत आहे. मागील तीन दिवसांत सुमारे 116 पुणेकरांनी मास्क न वापरण्यासाठी तब्बल 58 हजार रुपयांचा दंड पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.
मास्क वापरण्याबाबत महापालिकेकडून समुपदेशन केले जात आहे. त्यानंतर गरज वाटली तरच दंडाची पावती फाडली जात आहे. मात्र, त्यानंतरही काही पुणेकर मास्क वापरण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक तसेच गर्दीच्या ठिकाणी महापालिकेने पुणेकरांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तसे न आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतर मागील तीन दिवसांत तब्बल 116 पुणेकरांवर मास्क लावला नसल्याने कारवाई करण्यात आली आहे.
समुपदेशनही येईना कामी
मास्क न वापरणारे नागरिक रस्त्यावर दिसल्यास त्यांचे समुपदेशन केले जात आहे. मास्क वापरणे का गरजेचे आहे, हे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी सांगत आहेत. मात्र, “हे समुपदेशन आम्हाला नको’ असे सांगत अनेक बहाद्दर दंड भरण्यात धन्यता मानत आहेत. तर अनेकजण “दंड भरू, पण आम्हाला मास्क नको’ असे सांगत पैसे मोजण्यासही तयार आहोत, असे या कर्मचाऱ्यांना सांगत आहेत.