जामखेडमध्ये मतदान केंद्राकडे जाण्यासाठी मतदारांची कसरत

जामखेड ( प्रतिनिधी): राज्यात आज होत असलेल्या विधानसभेसाठी मतदान पावसामुळे काही प्रमाणात संथ गतीने होत असल्याचे दिसत आहे. राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान, जामखेड शहरात देखील झालेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचलेले आहे. त्यात रस्त्यात चिखल झाला असून त्यातून मतदारांची मतदान केंद्राकडे जाण्यासाठी कसरत सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, जामखेड शहरात आज पहिल्यांदाच मतदार उस्फूर्तपणे मतदान करत असल्याचे दिसत आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून जामखेडसह तालुक्‍यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील काही रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. सोमवारी सकाळी मतदान केंद्रावर जाण्यासाठी मतदारांना अक्षरशः चिखलातून वाट शोधावी लागली. शहरातील तहसील कार्यालयामागील मराठी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने वयोवृद्ध व्यक्तीना चालताना मोठी कसरत करावी लागत आहे.

वयोवृद्ध व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी परवानगी असताना काही ठिकाणी पोलीस 200 ते 300 मिटर लांब वाहनांना थांबवत आहेत. त्यामुळे तेथूनच वयोवृद्ध मतदारांना चिखलातून पायी चालत मतदान केंद्रावर जावे लागत आहे. दरम्यान, शहरात दुपारनंतर पावसाची शक्‍यता असल्याने नागरिक सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.