MP Election 2023 – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून त्यात मध्य प्रदेश (MP Election 2023) या राज्याचाही समावेश आहे. दरम्यान, चांगले मतदान व्हावे यासाठी येथील फूड स्टॉल मालकांनीही एक स्तुत्य पुढाकार घेतला आहे.
त्यानुसार मतदान करून आलेल्या व्यक्तीला पोहे आणि जिलेबीचा नाश्ता मोफत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या राज्यातील इंदोर हे शहर देशातील सगळ्यांत स्वच्छ शहर असा लौकिक प्राप्त केलेले शहर आहे.
या शहरात 56 दुकान नावाची प्रसिध्द चाट चौपाटी आहे. 17 नोव्हेंबरच्या दिवशी जी व्यक्ती मतदान करून आल्यावर आपल्या बोटावरची शाई दाखवेल त्यांना मोफत नाश्ता दिला जाईल असे या चौपाटीवरील स्टॉल चालकांनी जाहीर केले आहे.
56 दुकान व्यापारी संघाचे अध्यक्ष गुंजन शर्मा म्हणाले की स्वच्छतेच्या संदर्भात इंदोर शहराने देशात पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. आता मतदानाच्या संदर्भातही आमचे शहर पहिल्या क्रमांकावर यावे अशी आमची इच्छा आहे.
त्यामुळे मतदानाच्या दिवशी हा उपक्रम अमलात आणण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अर्थात ही योजना सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच असणार आहे.
त्यानंतर दिवसभरात जे कोणी मतदान करून येतील त्यांना नाश्त्यात 10 टक्के सूट दिली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, भारतीय अन्न सुरक्षा नियामक यांनी या 56 दुकानला क्लीन स्ट्रिट फूड हब हा दर्जा बहाल केला आहे.
खवय्यांची या चाट चौपाटीवर कायमच गर्दी उसळलेली असते. आता राज्यातील विधानसभा निवडणुकीची रंगत वाढू लागली असताना चौपाटीवरची गर्दीही वाढत चालली आहे.
दरम्यान, येथे येणारे नागरिक शहरातील समस्यांबाबतही येथे आपले मत नोंदवत असतात. शहराच्या मध्य भागातील वाहतुकीच्या संदर्भातही या लोकांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.