वाल्हे –
विठ्ठल विठ्ठल गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ।।
होतो नामाचा गजर।
दिंड्या पताकांचा भार ।।
निवृत्ति ज्ञानदेव सोपान।
अपार वैष्णव ते जाण ।।
हरिकिर्तनाची दाटी ।
तेथे चोखा घाली मिठी ।।
या संयोक्तीप्रमाणे सावळ्या विठुरायाचे दर्शनाने तृत्प झालेले वारकरी आणि वारी सोहळा पूर्ण करून आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषींच्या पालखीचे रिमझीम पाऊस झेलत वाल्हेनगरीत उत्साहात स्वागत करण्यात आले.
आद्यकवी महर्षी वाल्मीकी ऋषींच्या पालखी सोहळ्याचे रिमझीम पाऊस झेलत महर्षी वाल्मिकी ऋषी की जयच्या जयघोषात वाल्हे (ता. पुरंदर) येथील आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषींचा उत्तराई वाल्मिकी दिंडी सोहळ्याचे सोमवार (दि. 11) सायंकाळी व महर्षि वाल्मिकी सोहळ्याचे मंगळवार (दि. 12) या दोन्हीं वाल्मिकी ऋषींच्या पालख्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी वाल्हेगवांतर्गत मेन बाजारपेठमधून महर्षी वाल्मीकी मंदिरामध्ये सोहळ्याची सांगता करण्यात आली.
सरपंच अमोल खवले यांनी पुष्पहार श्रीफळ देऊन सोहळ्याचे स्वागत केले. याप्रसंगी सोहळा प्रमुख माणिक महाराज पवार, अशोक महाराज पवार, सूर्यकांत भुजबळ, सोनबा भुजबळ, वाल्हे राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सागर भुजबळ, सचिन देशपांडे, महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदाय पश्चिम विभाग उपाध्यक्ष पुरंदर तालुका विलास भुजबळ, लक्ष्मण बुनगे, पांडूरंग पवार, सर्जेराव कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.