ब्रुसेल्स,- बेल्जियममध्ये करोनाच्या निर्बंधांच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करावा लागला.
बेल्जियममध्ये सलग तिसऱ्या आठवड्यात करोना विरोधा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शुक्रवारी याबाबतची घोषणा झाल्यावर आंदोलनाला सुरूवात झाली. निर्बंधांमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण आला असून त्यामुळे अन्य रोगांमुळे आजारी असलेल्या रुग्णांनाही योग्य उपचार मिळेनासे झाले आहेत. म्हणून शेकडो नागरिकांनी युरोपीय संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला होता.
त्यामध्ये महिला आणि बालकांचाही समावेश होता. शांतपणे सुरू असलेल्या मोर्च्यातील काही जणांनी पोलिसांचे अडथळे ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारे मारायला सुरूवात केली.
त्यानंतर जमावाने पोलिसांवर दगडफेक करायला आणि जाळपोळ करायला सुरूवात केली. त्यानंतर प्रक्षुब्ध जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. या झटापटींमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.