मुंबई – आदिपुरुष हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात आजच्या काळानुसार रामायण मोठ्या पडद्यावर सर्वांसमोर आणणार आहे. परंतु त्या पूर्वी या चित्रपटातील पात्रांमध्ये केलेल्या बदलामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आवाज उठवायला सुरुवात केली आहे. आता या चित्रपटाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचे समजते.
नुकताच चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर स्वतः दिग्दर्शक ओम राऊत यांनी अनेकदा माध्यमांशी बोलताना या चित्रपटात काहीही चुकीचे दाखवले नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही अनेकांनी या चित्रपटाविरोधात आपला विरोध दर्शवला. अनेक ठिकाणी या चित्रपटाविरोधात पोस्टर्स देखील जाळण्यातआल्याचे समजते.
चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत अभिनेता सैफ अली खान आणि प्रभाववर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये प्रभुरामचंद्र आणि सीतेची वेशभूषा चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये दिवाणी न्यायालयाचे वकील हिमांशू श्रीवास्तव यांनी आदिपुरुष चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केलीये. चित्रपटाच्या टीजरमुळे अनेकांच्या भावना दुखावल्याचे याचिकेत म्हंटले आहे. तसेच हिंदू सेनेने देखील या चित्रपटाविरोधात हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.