मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख व मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर झालेल्या अपघातात निधन झाले. या महामार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. मेटे हे आज रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांबरोबर मराठा आरक्षण संबंधात होणाऱ्या बैठकीसाठी बीडहून मुंबईकडे निघाले होते. त्यांच्यासमवेत त्यांचे एक सहकारी आणि बॉडीगार्ड होता. तेही यात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उद्या त्यांच्या पार्थिवावर बीड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
विनायक मेटेंचा राजकीय प्रवास
1986मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून विनायक मेटे यांनी काम सुरू केले. 1987मध्ये पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख निवड करण्यात आली.
1994मध्ये परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. 1995मध्ये त्यांनी मराठवाडा लोकविकास मंचची स्थापना केली. 1998मध्ये नवमहाराष्ट्र विकास पार्टीची स्थापनाही विनायक मेटेंनी केली.
विनायक मेटेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काम केले. त्यानंतर 1999मध्ये राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पडली. 2002मध्ये त्यांनी शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली होती.
विधिमंडळ कारकीर्द
31 जानेवारी 1996 ते 20 एप्रिल 2000 या काळात ते पहिल्यांदा विधान परिषदेत गेले. राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांनी काम केले. 28 जुलै 2000 ते 27 जुलै 2006 मध्ये ते आजपर्यंत ते विधानसभा सदस्यांतून विधान परिषदेतून निवडून गेले होते. सलग ते पाचव्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले होते.
“शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले.”
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
“शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांचे सामाजिक कार्य तसेच उपेक्षित समाज घटकांच्या विकासातील योगदान मोठे आहे.”
– भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल