मुंबई – मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढणारे नेते अशी महाराष्ट्रभर ओळख असलेल्या विनायक मेटे यांचा रविवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला. मेटे यांच्या अकाली निधनाने त्यांचे राज्यभरातील कार्यकर्ते शोक सागरात बुडाले आहेत. मेटे यांच्या अपघाती निधनाबाबत त्यांचे कार्यकर्ते व कुटुंबियांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता मेटे यांच्या डॉक्टर पत्नी ज्योती मेटे यांनी वैद्यकीय टर्मीनोलॉजीच्या आधारे मेटेंच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.
“त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्त येत होतं…”
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ज्योती मेटे यांनी, “मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे साहेबांना पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की काहीतरी वाईट घडलंय. कारण मेडिकल टर्मीनोलॉजीनुसार, मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही. काही वेळ गेल्यानंतर तो पांढरा पडतो. पण साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता. त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्त येत होतं.”
मी साहेबांच्या हाताची आणि मानेची नाडी तपासली, पण…
त्या म्हणाल्या, “रुग्णालयात गेल्याबरोबर मी त्यांच्या नाडीचे ठोके तपासले. त्याठिकाणी डॉक्टरही होते, त्यांनी मला बाहेर जाण्यास सांगितलं. पण मी विनायक मेटेंची बायको आणि डॉक्टर असल्याचं त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला तिथे थांबण्याची परवानगी दिली. मी साहेबांच्या हाताची आणि मानेची नाडी तपासली, पण ती हाताला लागली नाही. ईसीजीमध्येही कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या.”
“आमच्यापासून काहीतरी लपवलं जात होतं…”
“त्यानंतर मी माझ्या भावाला सांगितलं की, हे थोड्या वेळापूर्वी घडलेलं नाही. मला फोन आल्यानंतर मी जवळपास पाऊण तासात याठिकाणी पोहोचले. पण ही पाऊण तासांपूर्वी घडलेली घटना नव्हती, ही घटना घडून किमान दोन तास उलटले होते, म्हणजे आमच्यापासून काहीतरी लपवलं जात होतं. कदाचित ते लपवतही नसतील, मीच भयाकुल असेल, नेमकं काय असेल? हे मला माहीत नाही. पण मला फोन येण्याअगोदर अपघाताची घटना घडून खूप वेळ झाला होता. या सर्व बाबी आता शवविच्छेदन अहवालातून समोर येतील, मृत्यूची नेमकी वेळही समजेल.” असेही त्यांनी सांगितले.