राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – तब्बल सात वेळा बैलगाडा शर्यतीमध्ये हिंदकेसरी किताब मिळवणार्या वाफगाव येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक राजेश वसंतराव जवळेकर यांच्या मन्याभाई या 18 वर्षांचा अपराजित योद्ध्याचे निधन झाले.
त्याच्या निधनाने बैलगाडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मन्याभाईच्या मृत्यूची बातमी समजताच बैलगाडा मालक बैलगाडा शर्यत शौकीन यांनी वाफगावात मोठी गर्दी केली.
प्रसिद्ध बैलगाडा मालक शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश वसंतराव जवळेकर यांच्या सप्तहिंदकेसरी मन्या बैलाने सोमवारी (दि. 26) जगाचा निरोप घेतला. पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील बैलगाडा मालक व शौकिनांचा सर्वांत लोकप्रिय सप्त हिंदकेसरी मन्या बैल होता. त्याचे निधन झाल्याने समजताच बैलगाडा प्रेमीमधून हळहळ व्यक्त होत आहे.
सोशल मीडियावर मन्या बैलाच्या निधनाने अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवत त्याला श्रद्धांजली वाहिली. वाफगाव येथे हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत गोठ्याजवळच्या परिसरात खड्डा खोदून त्याला त्यात ठेऊन त्यावर धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
जेव्हा कधी बैलगाडा क्षेत्रावर पुस्तक लिहिले जाईल तेव्हा पहिला धडा तुझ्या नावाचा असेल. वाघा. मालकाच, गावाचे व तालुक्याचे आणि पुणे जिल्ह्याच नाव करून गेला. तुझ्यासारखा बैल होणे नाही. बैलगाडा क्षेत्रातील कोहिनूर हिरा संपला.अशा शब्दात अनेकांनी मन्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करताना भावना व्यक्त केल्या.
मन्याची घाटातील बारी पाहण्यासाठी
पुणे जिल्ह्यातल्या बैलगाडा घाटातील सर्वात वेगवान किंग, सप्त हिंदकेसरी, भारतकेसरी, सह्याद्री केसरी अशा अनेक बैलगाडा शर्यती त्याने जिंकल्या होत्या. प्रत्येक घाटात स्वताःचे रेकॉर्ड करणार्या मन्याने 125 मोटर सायकल, 5 चारचाकी वाहने, शेकडो चषक, 1500 पेक्षा जास्त फायनल खेळणारा व 800 पेक्षा जास्त घाटात घाटाचा राजा किताब पटकावले होते. मन्याची घाटातील बारी पाहण्यासाठी घाटामध्ये 3-4 लाख गाडाशौकीन जमा होत होती. घाटात प्रचंड गर्दी होत असायची.