सातारा – अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या शुभम प्रकाश ढवळे (रा. आगाशीवनगर, ता. कराड) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ढेबेवाडी (ता. पाटण) येथे अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल, चार मॅगझीन, तीस जिवंत काडतुसे व मोबाइल, असा एक लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ढेबेवाडी परिसरात एक युवक गावठी पिस्तूल विकायला येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना कारवाईबाबत सूचना दिली. जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रविवारी (दि. 20) रात्री ढेबवाडी परिसरात सापळा लावला असता शुभम ढवळे हा युवक संशयास्पदरित्या फिरताना दिसला.
जऱ्हाड यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडून अंगझडती घेतली, तेव्हा त्याच्या कमरेला एक पिस्तूल लावलेले दिसले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने आणखी एक पिस्तूल, चार मॅगझीन, तीस जिवंत काडतुसे काढून दिली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील कारवाईसाठी त्याला ढेबेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचण, शरद बेबले, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, संजय जाधव यांनी ही कारवाई केली.