पुणे – करोनाच्या संकटाने अनेक नागरिकांच्या मनात भीती आणि नैराश्याचा अंधार दाटला होता. तो दूर करणाऱ्या दीपोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. सूर्यास्तावेळी गाय आणि वासराच्या पूजनाने दिवाळीला सुरुवात झाली असून, गुरुवारी घरोघरी पहिला दिवा लागला.
भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला होता. फटाक्यांची आतषबाजी, फराळाची मेजवानी, आनंद आणि उत्साहात देशभरात दिवाळी साजरी होते. गुरुवारी दिवाळीला प्रारंभ झाला. यानंतर शुक्रवारी धनत्रयोदशी, शनिवारी लक्ष्मीपूजन, सोमवारी बलिप्रतिपदा (दीपावली पाडवा) आणि भाऊबीज साजरी होणार आहे.
वसुबारसेपासून दीपावलीची सुरुवात होते. गुरुवारीदेखील शहराच्या मध्यवर्ती पेठांसह उपनगरांतील भागांत सायंकाळी गाय आणि वासराची पूजा करण्यात आली. पूजेनंतर गायीला ओवाळून गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण केला. दरवर्षी विविध चौक, सोसायट्यांमध्ये वसुबारसेचे आयोजन केले जाते. यंदा मात्र ठराविक ठिकाणीच पूजनाचे आयोजन केले होते.
आज धनत्रयोदशी
निरामय आरोग्याच्या प्रार्थनेसाठी धन्वंतरी पूजन आणि ऐश्वर्याचे प्रतीक असणाऱ्या धनाची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी करण्यात येते. घरातील ठेवणीचे दागदागिन्यांचे लक्ष्मी म्हणून पूजन करण्याचा दिवस. दागिने चौरंगावर मांडून याची पूजा करण्यात येते. भगवान विष्णू, धनलक्ष्मी, कुबेर, योगिनीदेवता, श्रीगणेशा, द्रव्यनिधी अलंकारांचे पूजन करून फराळाचा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर लाह्या बत्तासे वाहावेत. सूर्यास्ताच्या वेळी ही पूजा करावी. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर व्यापाऱ्यांकडून पारंपरिक चोपडीची (हिशेबाची वही) पूजा करण्यात येते.