पंढरपूर: पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी मूर्तीला वज्रलेप करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. विधी व न्याय विभागाने वज्रलेप करण्यास मान्यता दिली आहे. तब्बल 8 वर्षांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवर लेपन प्रक्रिया होणार आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठूरायाचं पदस्पर्श दर्शन घेता येते. पदस्पर्श, मंदिरातील वातावरण आणि मूर्तीवर होणारे राजोपचार यामुळे मूर्तीची झीज होत आहे. याबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मूर्तीला वज्रलेप करण्यास परवानगी द्यावी, असा ठराव महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवला होता. या ठरावाला आता मान्यता मिळालेली आहे.
पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांशी चर्चा करून आषाढी एकादशीच्या पूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप होऊ शकतो, अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. यापूर्वी 2005 आणि 2012 साली श्रीविठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप प्रक्रिया पार पडली आहे. यामुळे मूर्तीचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.