Vadodara police seize Rs 1 crore from former women’s cricket coach : भारतीय क्रिकेट जगताशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे ( Tushar Arothe ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वडोदरा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन टीमने तुषार आरोठेंच्या घरावर छापा टाकला आहे. पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. तुषार आरोठे हे वडोदरातर्फे देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली त्यांना अटकही झाली आहे.
तुषार आरोठे यांच्या घरावर पोलिसांचा छापा…
भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे ( Former Indian women’s cricket team coach Tushar Arothe ) यांच्याविरोधात वडोदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वडोदरा पोलिसांनी तुषार आरोठे यांच्या घरातून एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. आरोठे यांच्या प्रतापगंज येथील राहत्या घरातून एका बॅगेत एक कोटी रुपयांची रोकड सापडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तुषार यांच्या घरात मोठी रोकड ठेवल्याची माहिती मिळाली होती, असे पोलिसांनी सांगितले आहे. यानंतर पोलिसांनी आरोठे यांच्या घरावर छापा टाकला.
तुषार आरोठे यांच्या अडचणीत वाढ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार आरोठे यांच्या घरी त्यांचा मुलगा ऋषी याच्या अपार्टमेंटमधून ही रोकड आली होती. याबाबत आरोठे यांना विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे ही रोकड जप्त करण्यात आली. एसओजीचे निरीक्षक व्हीएस पटेल यांनी सांगितले की, गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही रोकड जप्त करण्यात आली. आता तुषार यांना न्यायालयात हजर राहून एवढी रोकड कुठून आणली हे सांगावे लागेल. मात्र, पोलिसांनी अद्याप तुषार आणि त्यांच्या मुलाला अटक केलेली नाही.
मॅच फिक्सिंगचेही झाले आहेत आरोप…
तुषार आरोठे यांना 2019 साली आयपीएल फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. एप्रिल 2019 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान सट्टेबाजी केल्याप्रकरणी वडोदरा गुन्हे शाखेने शहरातील स्थानिक कॅफेमधून आरोठे यांच्यासह 19 जणांना अटक केली होती.
दरम्यान, तुषार आरोठे हे भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली. मात्र 2018 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 2008 ते 2012 दरम्यान तो कोचिंग स्टाफचा एक भाग होते.