18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करा; खासदार राहुल शेवाळे मागणी

मुंबई  – राज्यासह मुंबईत दररोज हजारो करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मुंबईतील सर्वात दाट वस्ती आणि आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोनाचा संसर्ग वाढला तर आणखी भयानक परिस्थिती उद्‌भवू शकते. त्यामुळे या धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना करोना प्रतिबंधक लस मिळावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.

करोना लसीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना पत्र लिहिले आहे. राहुल शेवाळे यांनी पत्रात म्हटले आहे की, गतवर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, नागरिकांची स्वयंशिस्त, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धारावीकरांनी करोनावर मात करून एक अनोखं सकारात्मक उदाहरण जगासमोर ठेवले होते.

आता करोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीतील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
धारावीत बहुसंख्य नागरिक हे आरोग्य आणि सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत धारावीतील 18 वर्षांवरील सर्वांना करोनाची लस दिल्यास मोठ्या संकटापासून धारावी आणि मुंबई वाचू शकेल. तसेच एक अनोखं उदाहरण यानिमीत्ताने सादर करता येईल, असेही त्यांनी पत्रात लिहिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.