नवी दिल्ली : टॅलेंट असेल तर वय, राज्य किंवा देशाच्या मर्यादा संपुष्टात येतात. असच काहीस उत्तराखंडच्या चंपावतमध्ये पाहायला मिळत आहे. येथील यशवंत चौधरी या तरुणीने अगदी लहान वयातच आभाळाऐवढं यश मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. .
यशवंतला एका बहुराष्ट्रीय कंपनीत कोट्यवधी रुपयांचे वार्षिक पॅकेज असलेली पहिली नोकरी मिळाली आहे. चंपावत जिल्ह्यातील यशवंत चौधरी याने लहान वयात मोठे पद मिळवून उत्तराखंड आणि जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. यशवंतला वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी 23 कोटी रुपयांहून अधिकचे ($3 दशलक्ष) पॅकेज मिळाले आहे.
अभियंता असलेल्या यशवंतला जर्मनीच्या टेस्ला गिगा कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापकाची नोकरी मिळाली आहे. बेंगळुरूमध्ये ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण घेतल्यानंतर यशवंतला नोव्हेंबरमध्ये बर्लिनमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. व्यापारी शेखर चौधरी यांचा मुलगा यशवंत याने पिथौरागढमधून बीटेक केल्यानंतर 2020 मध्ये गेट परीक्षेत 870वी रँक मिळवली होती. दोन वर्षांपूर्वी त्याची बंगळुरूमध्ये ट्रेनी मॅनेजर म्हणून निवड झाली होती. त्याने करोना काळात घरून काम केले होते.
यशवंतने सांगितले की, जर्मनीतील बर्लिन येथे टेस्ला गिगा कंपनीत आपल्याला 3 मिलियन डॉलर्सच्या पॅकेजची नोकरी मिळाली असून वरिष्ठ व्यवस्थापकपदासाठी आपली निवड झाली आहे. 31 जुलैपर्यंत ऑनलाइन काम केल्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत बेंगळुरूमध्ये प्रशिक्षण होणार आहे. यानंतर नोव्हेंबरमध्ये बर्लिनमध्ये सेवा देण्यास सुरुवात होईल, असही यशवंतने नमूद केलं.
यशवंत म्हणतो, की सुरुवातीपासूनच माझं बहुराष्ट्रीय कंपनीत काम करण्याचं स्वप्न होतं. जेणेकरून माझा अनुभव देशातील कोणतीही मोठी जबाबदारी पेलताना उपयोगी पडू शकेल. या यशानंतर यशवंत याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यशवंतच्या या यशाने घरातील सदस्यही खूश आहेत.