बिजींग – रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची एआयआयबी म्हणजेच अशियन इन्फ्रास्ट्रकचर इनव्हेस्टमेंट बॅंकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बॅंकेत भारताचे चीन खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक शेअर्स आहेत. भारत या बॅंकेचा संस्थापक सदस्य देश आहे. चीनचे माजी उपाध्यक्ष जीन लिकन हे या बॅंकेचे प्रमुख आहेत.
या बॅंकेला एकूण पाच उपाध्यक्ष आहेत. पटेल हे त्यापैकी एक असतील. त्यांचा कालावधी तीन वर्षांसाठी असेल. पुढील महिन्यात ते आपली नवीन जबाबदारी स्वीकारणार आहेत. मावळते उपाध्यक्ष डी. जे पंडियन यांच्या जागी पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंडियन हे गुजरातचे माजी मुख्य सचिव आहेत.
उर्जित पटेल यांनी अचानकपणे रिजर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी कोणतीच जबाबदारी आत्तापर्यंत स्वीकारलेली नव्हती. पटेल यांनी या आधी इंटरनॅशनल मॉनेटरी फंड या संस्थेतही काम केले आहे.