इंदापूरात नागरिकांच्या कामांचा खोळंबा
रेडा- महसूल कर्मचाऱ्यांनी गुरुवार (दि. 5) पासून बेमुदत काम बंद आंदोलनास सुरुवात केली असल्याने इंदापूर तहसील कार्यालयातील कामांचा खोळंबा झाला असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र शासनाकडून तत्वतः मान्य करण्यात आलेल्या; परंतु शासन निर्णय निर्गमीत न झालेल्या मागण्या, त्यामध्ये नायब तहसीलदाराला राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देण्यात आला असून सहाव्या वेतन आयोगानुसार ग्रेड पे मात्र वर्ग तीनच्या पदाचा देण्यात आलेला आहे.
नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे 4600 रुपये करण्यात यावा. महसूल लिपीकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक असे करण्यात यावे, नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरती प्रमाणे 33 टक्क्यांवरून 20 टक्के करणे, अव्वल कारकून (वर्ग -3) या संवर्गाच्या वेतन श्रेणीमधील त्रुटी दूर करणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे, आकृतीबंधात सुधारणा करण्याबाबत दांगट समीतीने सादर केलेल्या अहवालानुसार पदे मंजूर करणे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नायब तहसीसलदार, तहसीलदार व उपजिल्हाधिकारी पदासाठी गृह विभागाच्या धर्तीवर महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात, यास विविध मागण्या मान्य करण्यात याव्यात म्हणून इंदापूर येथे महसूलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनास सुरूवात केली आहे.