वडूज – खटाव तालुक्यातील विखळे फाटा येथील एका शिवारात शनिवारी (दि. 16) रात्री एका युवकाला मारहाण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्या प्रकरणी राहुल रामचंद्र शिंदे व प्रशांत संभाजी निकम (रा. नागेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) यांना वडूज पोलिसांनी रविवारी अटक केली.
याबाबत माहिती अशी, पीडित युवक कलेढोण, ता. खटाव येथे एका कंपनीत काम करत होता. कंपनीने कामावरून काढल्याने तो विखळे येथे एका बारमध्ये मद्यपान करत बसला होता. त्यावेळी तेथे आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्याची विचारपूस केली. त्यातून त्यांची ओळख झाली. त्यानंतर तिघांनी मिळून मद्यपान केले. त्यानंतर संशयितांनी, कंपनीकडून राहिलेले पैसे मिळवून देतो, तू आमच्याबरोबर चल, असे म्हणून त्या युवकाला सोबत घेतले. कलेढोणकडे जाताना रस्त्यात मध्येच विखळे फाटा येथे वाहन थांबवून दोघांनी युवकाला मारहाण केली. त्याला एका शिवारात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेने मानसिक धक्का बसलेल्या युवकाने वडूज पोलीस ठाणे गाठले.