देशभरातही नागरीकांचे स्वत:वर आणि इतरावर प्रयोग
नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे देशात प्रदिर्घ लॉक डाऊन सुरू झाल्यामुळे अनेक क्षेत्रात गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशभरातील केशकर्तनालय बंद आहेत. त्यामुळे अनेकांच्या डोक्यावरचे जंगल वाढले आहे. त्याचबरोबर दाढी वाढली आहे. या परिस्थितीत काही लोक स्वतः स्वतःची मदत करत आहेत किंवा नातेवाइकाकडून मदत घेत आहेत. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचीही दाढी या काळात वाढली. त्यांच्या मुलाने ती कमी करण्याचा प्रयत्न केला.
रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पास्वान यांनी यासंबंधातील एक व्हिडीओ ट्विटरवर टाकला आहे. यात चीराग यांनी म्हटले आहे की, काळ कठीण आहे. मात्र यातही एक उजेडाची बाब आहे. आपण इतरांची दाढी करू शकतो, याचे कौशल्य आपल्याकडे असू शकते, याचा साक्षात्कार मला लॉकडाऊनच्या काळात झाला. यामुळे अनेक घटना स्मरणात राहतील.
रामविलास पासवान आपल्या घरात एका खुर्चीवर बसले आहेत. तर त्यांच्या अंगावर कपडा टाकून चिराग पास्वान इलेक्ट्रिक ट्रिमरचा वापर करून त्यांची दाढी कमी करीत असल्याचा व्हिडीओ दाखविण्यात आला आहे. ट्विटरवरील नेटकऱ्यांनी चिराग पासवान यांच्या या पितृसेवेबद्दल कौतुक केले आहे. वडिलांची दाढी मुलगा करतो ही आनंददायी घटना आहे असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.
तर दुसरा नेटकरी म्हणतो की, तुमच्या वडिलांना तुमच्या या सेवेबद्दल अभिमान वाटत असणार आहे.
देशभरातून सर्वसामान्य नागरिकही अशा प्रकारचे प्रयोग स्वतःवर आणि इतरावर करीत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले. यामध्ये केशकर्तनालय ही सेवा अत्यावश्यक समजलेली नाही. त्यामुळे देशभरातील केशकर्तनालय बंद आहेत. पंधरा दिवसापूर्वी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला भली मोठी दाढी घेऊन कारागृहातून बाहेर आले होते. त्यावेळी त्यांनी केशकर्तनालय ही जीवनावश्यक बाब समजली जावी असे ट्विट केले होते.