न्यायाधीश, समुपदेशकांचे यशस्वी प्रयत्न
पुणे – घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घेताना त्यामागे प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात. व्यक्तीनुसार बदलणारा स्वभाव, एकमेकांशी अजिबातच न पटणे, नवरा किंवा सासरच्या लोकांकडून होणारा त्रास यासह विविध कारणांमुळे घटस्फोटाचा पर्याय स्वीकारला जातो.
घटस्फोटामुळे दोन व्यक्तीच नाही, तर दोन कुटुंबे दुरावतात. असे होऊ नये आणि कुटुंब जोडलेली राहावीत, यासाठी कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश आणि विवाह समुपदेशक प्रयत्नशील असतात. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, 2019 मध्ये 133 जोडप्यांनी पुन्हा गोडीगुलाबीने नांदण्यास सुरुवात केली आहे.
पुण्यातील कौटुंबिक कार्यरत असलेल्या प्रमुख न्यायाधीशांसह एकूण पाच न्यायाधीश आणि बारा विवाह समुपदेशकांमुळे 133 जोडपी पुन्हा एकत्र आली आहेत. गेल्या वर्षी 4 हजार 870 नवीन दावे दाखल करण्यात आले होते. त्यातील 3 हजार 289 दावे निकाली काढण्यात आले. त्यात परस्पर संमतीने 1 हजार 625 घटस्फोट घेण्यात आले. कौटुंबिक न्यायालयात कायद्याच्या कलम नऊप्रमाणे वैवाहिक स्वरूपाच्या दाव्यांमध्ये पक्षकारांमध्ये आपापसात तडजोडीचे प्रयत्न करणे आवश्यक असते. अशा पक्षकारांना एकत्र राहण्यासाठी किंवा एकत्र राहणे शक्य नसल्यास परस्परसंमतीने घटस्फोट घेण्यासाठी समुपदेशन केले जाते; तसेच मुलांचा ताबा, त्यांची भेट, स्त्री-धन आणि जोडीदारामधील मालमत्तेचे वाद यासंबंधीही समुपदेशन करून समजुतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो.
न्यायाधीशसुद्धा पक्षकारांना मदत करतात. समुपदेशक आणि न्यायाधीशांच्या प्रयत्नांना वकिलांकडूनही सहकार्य मिळत असते.