प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -देशांतर्गत विमानसेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्याची गरज आहे. त्यासाठी विमानासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनावर (एटीएफ) एक ते चार टक्क्यांपर्यंत मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करणे आवश्यक आहे. देशातील 8 राज्यांमध्ये “एटीएफ’वर 20 ते 30 टक्के कर आकारला जात असून, महाराष्ट्र हे त्यातील एक राज्य आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात “फेस्टिव्हल ऑफ थींकर्स’ व्याख्यानात सिंधिया बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, “सिंबायोसिस’चे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते उपस्थित होते.
सिंधिया म्हणाले, “”देशातील 12 राज्यांमध्ये विमानासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनावर (एटीएफ) केवळ एक ते चार टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारण्यात येत आहे. परंतु अन्य राज्यांमध्ये 20 ते 30 टक्के कर आकारला जातो. नागरी विमानसेवा ही अधिकाधिक सुलभ होण्यासाठी हा कर कमी होणे गरजेचे आहे. म्हणूनच देशातील 22 मुख्यमंत्र्यांशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यातील 16 मुख्यमंत्र्यांनी हा कर कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत.”
देशातील नागरी विमानसेवाबाबत सिंधिया म्हणाले, “”2013-14 मध्ये देशात 74 विमानतळ होती. आता ती संख्या 141 पर्यंत गेली आहे. देशात 2013-14 मध्ये 400 विमाने होती. गेल्या आठ वर्षांत देशात 300 विमाने नव्याने समाविष्ट झाली.”
डॉ. मुजूमदार यांनी सिंधिया यांच्या पूर्वजांचा संदर्भ देत त्यांची महाराष्ट्र आणि मराठी माणसांशी असणारी ओळख करून दिली. त्यालाच सन्मानपूर्वक उत्तर देत सिंधिया यांनी व्याख्यानाची सुरुवात मराठीतून केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. येरवडेकर यांनी केले.
वर्षाला एक हजार पायलट तयार व्हावेत
देशभरात विमानसेवेचा विस्तार होत आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी वाढणाऱ्या विमानांची संख्या लक्षात घेता दरवर्षी जवळपास एक हजार पायलट तयार करणे गरजेचे आहे. देशात सध्या 34 फ्लाईंग ट्रेनिंग स्कूल असून, येत्या वर्षभरात नव्याने नऊ फ्लाईंग ट्रेनिंग स्कूल उभारण्यात येणार असून, त्यापुढील टप्प्यात आणखी सहा फ्लाईंग ट्रेनिंग स्कूल काढण्यात येणार आहेत, असेही सिंधिया यांनी सांगितले.